तुम्ही “जाने तू या जाने ना” हा हिंदी चित्रपट जर पाहिला असेल तर तुम्हाला ही गंमत नक्कीच आठवत असेल.  चित्रपटाच्या नायकाला हे सांगण्यात आले होते की जर त्याला राठोड कुळाचे नाव राखायचे असेल तर त्याला त्याच्या तीन अटी पूर्ण करायला पाहिजेत – “वो घोड़े पर सवार होगा”, “किसीकी हड्डी पसली एक करेगा” आणि “वह एक बार जेल जायेगा”. चित्रपटाच्या अखेरीपर्यंत तो त्या तीन्ही अटी पूर्ण करतो.
 मी तेव्हा गमतीने हा विचार केला होता की हेच जर कोंडेकर कुळाचे नाव राखायचे असेल तर अटी काय असतील आणि मग मी या तीन अटी बनवल्या – “शिक्षकी पेशा पत्करेल”, “घर किरायाने देईल” आणि “एका संस्थेचा कोषाध्यक्ष बनेल.  २००९ साली मी मुंबईला घर बदलताना, हैदराबादचे घर किरायाने दिले आणि हे घोषित केले की मी कोंडेकर कुळाचे नाव राखलेले आहे. मी काही वर्ष एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि शिवाय आमच्या हैदराबादच्या अपार्टमेंटच्या असोसिएशनचा कोषाध्यक्ष होतो, अगदी हैदराबाद सोडून मुंबईला जाईपर्यंत.  प्रथम दर्शनी असं वाटेल कि मी या तीन अटी माझ्या सोयीप्रमाणे बनवल्या आहेत पण जेव्हा तुम्ही माझ्या आई-वडिलांच्या जीवनशैली कडे आणि त्यांनी आम्हाला कसं वाढवलं या कडे पहाल तर मात्र तुम्हाला हे समर्पक वाटेल.
माझी आई आणि वडील दोघेही पेशाने शिक्षक होते आणि आता सेवानिवृत्त आहेत.  शालेय विषय तर आम्ही त्यांच्याकडून शिकायचोच पण त्यासोबत कुठे तरी आम्ही त्यांची शिकवण्याची कला सुद्धा शिकत होतो. आई सोबत अभ्यास करताना तर तो अभ्यास वाटायचाच नाही. ती घरातलं काम करताना आम्ही तिच्या अवती भोवती फिरत पुस्तक वाचायचो आणि ती आम्हाला विषय समजून घ्यायला मदत करायची. भाषा विषयांमध्ये जी नाटकं असायची ती आम्ही पात्र वाटून घेऊन  प्रत्यक्षात करून पाहायचो. आम्ही भाऊ एकमेकासाठी प्रश्नपत्रिका बनवून सराव करायचो. अगदी सुटीच्या दिवशी सुद्धा शाळेचा टाईम टेबल फॉलो करत अभ्यास करायचो. शाळेतल्या परीक्षा संपल्यानंतर जेव्हा उत्तरपत्रिका पडताळणीसाठी आमच्या घरी यायच्या तेव्हा त्यातल्या गमतीच्या उत्तर पत्रिका वाचायची आम्हाला पर्वणी वाटायची.
आई-वडिल अगदी हाडाचे शिक्षक होते त्यामुळे घरात एक शैक्षणिक वातावरण असायचं. वाचनालयातून पुस्तके आणि मासिके यायची. अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा किंवा लिहिण्याच्या स्पर्धा सर्वांमध्ये ते आम्हाला भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि कदाचित त्यामुळेच मला भाषण देणे कधीही अवघड वाटले नाही. भाषण किंवा लिखाण  हे मजेदार असावे असे आईचे म्हणणे असायचे. राज कपूरच्या एका गाण्याची फिरकी घेतआम्ही म्हणायचो “सीधी सी बात ना मिरची मसाला कैसे सुनेगा सुनने वाला”.
घर किरायाने देण्याच्या मागचं मूल्य, कष्ट करून पैसे मिळवणे व भविष्याची तजवीज करत राहणे हे आहे.  माझ्या आई-वडिलांचे बालपण गरिबीत गेले असंच म्हणावं लागेल आणि त्यांच्या लग्नानंतर त्यांना कोणाचाही आधार नव्हता. त्यांनी सर्व काही स्वतःच्या मेहनतीवर मिळवलं. त्यांनी कधीही वायफळ खर्च केला नाही आणि पै पै जोडून त्यांचं विश्व साकार केलं.  जेव्हा त्यांनी पहिल्यांदा तीन खोल्यांचं घर बनवलं, त्यातली एक खोली त्यांनी किरायाने दिली होती. आज जेव्हा घरामध्ये बारा खोल्या आहेत त्यांनी त्यापैकी आठ खोल्या किरायाने दिल्या आहेत. उत्पन्ना सोबतच घर हसतं खेळतं दिसतं आणि त्यांची मुलं जीआपल्या आपल्या कामात दुसऱ्या शहरात व्यस्त आहेत त्यांची उणीव थोडी कमी भासते. बौद्धिक कामासोबत घरात सतत शारीरिक कामं सुद्धा करत राहावी असे आमच्या वडिलांना वाटायचे. ते म्हणतात “हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे”. त्या मुळे आम्हाला घरचे कोणतेही काम करायची लाज वाटली नाही.
त्यांच्या कडून आम्हाला मिळालेली सगळ्यात मोठी शिकवणूक कदाचित प्रामाणिकपणा असेल. आणि प्रामाणिकपणाची कसोटी सगळ्यात जास्त कुठे लागत असेल तर ती म्हणजे जेव्हा पैशाचे व्यवहार असतात.  माझ्या वडिलांच्या पहिल्या नोकरीमध्ये त्यांना तालुक्याच्या गावाहून पूर्ण स्टाफच्या पगाराचे पैसे आणायची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत सर्वांनी त्यांच्यावर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवला.  आज सुद्धा ८० व्या वर्षी  ते दोन मंदिरांच्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत.
आई वडिलांची शिकवण कोठे तरी आपलं व्यक्तिमत्व बनवत असते. माझ्या शिक्षकी कारकिर्दीमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांचा आवडता राहिलो कारण माझा असाच प्रयत्न असायचा की तो विषय विद्यार्थ्यांना आवडावा. आज सुद्धा मी कोणतेही शारीरिक काम करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही आणि त्यामुळे शरीरात चपळता आणि मनात नम्रता मी ठेवू शकतो. हैदराबादला असताना जेव्हा मी आमच्या असोसिएशनचा कोषाध्यक्ष झालो तेव्हा असोसिएशनचा जमाखर्च लक्षपूर्वक ठेवण्यात येत नसायचा. आम्ही कामावर ठेवलेली माणसं पैशांचा गैरवापर करायची. मी कोषाध्यक्ष झाल्यानंतर मी असोसिएशनच्या जमा खर्चा मध्ये पूर्ण पारदर्शकता आणली. तीच कामावरची माणसं प्रामाणिक वाटू लागली. फक्त दोन रुपयाचा हिशोब जरी लागला नाही तरी मी तो घोळ सोडवण्यासाठी कितीही वेळ घालायला तयार असायचो.
आता बर्‍याच गोष्टी बदलल्यात, पण माझ्या आई वडिलांची जीवन मूल्ये आज पण माझ्यात आहेत आणि पुढेही राहतील. आज त्यांच्या लग्नाचा ५५  वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानी हा लेख लिहितोय.
आई दादा, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
(२८ फेब्रुवारी २०२१ )